Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Showing posts with label समाजसुधारक. Show all posts
Showing posts with label समाजसुधारक. Show all posts

Wednesday, 9 March 2016

साावित्रीबाई फुले

जन्म : नायगाव-सातारा जिल्हा,
जानेवारी ३, इ.स. १८३१.
मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७.
सावित्रीबाईंच्या आईचे
नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या
वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स.
१८४० साली जोतिराव फुल्यांशी
सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी
सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय
तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे
गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर,
परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची
जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन
राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले
हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती
जोतिराव फुले यांना लहानपणापासूनच
मातृप्रेम लाभले नाही.त्यांची मावस बहीण
सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला
होता. सगुणाआऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या
मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना
इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी
आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना
प्रेरित करण्यासाठी केला.
जोतिरावही शिक्षणाकडे
आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन
मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक
त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून
जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी
स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले.
सगुणाआऊ तर सोबत होत्याच दोघींनी
रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी
सावित्रीबाईंनी सगुणाआऊला मागासांच्या
वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची
पहिली शाळा.सगुणाऊ तेथे आनंदाने व
उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली
शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स.
१८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि
सवित्रीबाईंनी मुलींची शाळा
काढली. सगुणाआऊंना त्या शाळेत
बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश
भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही
पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी
मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या
१४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.)
या शाळेत सावित्रीबाई
मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू
लागल्या.त्या काळात पुण्यातील अन्य
भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू
केल्या व काही काळ चालवल्या. सुरुवातीला
शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल
संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन
पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत
सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला....
जग बुडणार....कली आला...." असे सांगून
केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण
फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात
टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा
शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला.
घर सोडावे लागले. सगुणाआऊ सोडून गेली.
अनेक आघात होऊनही
सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या
प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही
काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा
आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे
सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही
त्यांनी आळा घातला. बाल-जरठ
विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-
तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण
समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य
नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना
सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन
करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार
नसलेल्या या विधवा मग
कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर
विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला
येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच
मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा
आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर
उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू
केले सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.
फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या
विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व
अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले
मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या
ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.
त्याचे नाव यशवंत ठेवले.केशवपन बंद
करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे
प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे,
पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न
करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी
कल्पकतेने पार पडली.
सत्यशोधक समाजाच्या
कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स.
१८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक
समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.
आपल्या विचारांचा प्रसार
त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून
केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध
रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित
करण्यात आली. इ.स. १८९६ सालातल्या
दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला
सत्कार्याचा आदर्श घालून दिला.पोटासाठी
शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना
दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना
सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
त्यांच्या कार्याला हातभार
म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार
अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. इ.स.
१८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात
प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा
जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.
हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर
ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य
रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा
खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे
हाल ओळखून
सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ
वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना
सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या
कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.प्लेगच्या
रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही
प्लेग झाला. त्यातून मार्च १० , इ.स. १८९७
रोजी त्यांचे निधन झाले.
पुणे येथील हे शिक्षण कार्य
पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी
सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी
यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि
शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.
त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी
भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले
शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी
’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही
लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक
कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून
३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा
“बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाईची प्रकाशित पुस्तके काव्यफुले
(काव्यसंग्रह,१८५४) मातोश्री सावित्रीबाईंचे
भाषणे वगाणी (१८९१) हे आहेत.

Tuesday, 8 March 2016

गोपाळ गणेश आगरकर

भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य,
व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना
प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज
सुधारणांचा पाठपुरावा करणारे
समाजप्रबोधक!
महाराष्ट्रातील समाज
परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे,
बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे
अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ
तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ
आगरकरांकडे जाते.
आगरकरांचा जन्म सातारा
जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब
कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा
खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग
चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत
उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी
कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले
मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षणासाठी ते कर्हाड,
अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते
मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण
घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी
डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला.
वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व
स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन
बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा
प्रकारे त्यांची गुजराण चालत असे.
पुण्यात महाविद्यालयीन
शिक्षण घेत असताना ते व लोकमान्य टिळक
एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा
दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १
जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री
चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची
स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए.
झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले.
आगरकर व टिळक यांनी १८८१
मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’ , तर मराठीतून
‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू
केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी
स्वीकारले.
पुढे लोकमान्य टिळक व
आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन
सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत
१८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना
झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले,
पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही
झाले. राजकीय स्वातंत्र्याआधी
समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह,
अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट
रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा
विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध
राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या
ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व
सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक’ हे
वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य,
बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार
त्यांनी सुधारकमधून केला, तसेच
जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह,
ग्रंथ- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी
अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला.
अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार
केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही
भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी
सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार
गोखले यांनी सांभाळली होती.
आगरकर व्यक्तिवादाचे
पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती
बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग
त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत
आधार असो वा नसो, हे आगरकरांचे
महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी
पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार
समाजासमोर मांडले होते. राजकीय व
सामाजिक बाबतीत समता, संमती व
स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत;
मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी
असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके
सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे
म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची
सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा
समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे
त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे
त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी
लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची
प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण
तरीही निग्रहाने आणि निश्र्चयाने त्यांनी
आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.
वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी
त्यांचे अकाली, दुःखद निधन झाले.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले


‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अद्वितीय
संकल्पना भारतात मांडणारे; सार्वजनिक
जीवनात स्वत: ही संकल्पना आचरणात
आणणारे एक ‘आदर्श भारतसेवक’!
’झाले बहु होतील बहु; परंतु
या सम हा’ ही उक्ती ज्यांच्या बाबतीत सार्थ
ठरते असे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे
सुरुवातीच्या काळातील मवाळ, सनदशीर नेते
व आदर्श भारतसेवक म्हणजे नामदार गोपाळ
कृष्ण गोखले होत.
रत्नागिरी जिल्ह्यातील
कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे
बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे
गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही
येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे
वडीलबंधू गोविंदराव यांनी स्वत:चे शिक्षण
सोडून आणि त्यांच्या वहिनींनी स्वत:चे
दागिने विकून केलेल्या त्यागामुळे त्यांचे उच्च
शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व
मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले.
१८८४ मध्ये बी.ए. (गणित)
पदवी घेऊन जानेवारी, १८८५ मध्ये पुण्याच्या
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची
नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन
एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व,
फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५
मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर
फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू
असतानाच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या
माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात
प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे
सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य
केले. शेतकर्यांचे कर्ज, दुष्काळ व
सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल
अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे,
त्याबाबत पाठपुरावा करणे-
अशा महाराष्ट्रातील शेतकर्यांविषयक
करण्यात येणार्या कार्यात त्यांनी शिस्त
निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना
सर्वत्र मान्यता मिळाली.
१८८९ मध्ये कॉंग्रेसच्या
व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून
त्यांचा कॉंग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला.
आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते कॉंग्रेसशी
एकनिष्ठ राहिले. कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय
पातळीवरील नेते म्हणून गणले जात.
डिसेंबर, १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या
कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून
त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी
कॉंग्रेसचे कार्य भारतात व इंग्लंडमध्येही
केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी,
निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने
१३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक
समाजाची (The Servants of India
Society) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या
विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२पासून
मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी
अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ
काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते.
सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे
गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा
होता.ते भारतातील पहिल्या श्रेणीचे
अर्थतज्ज्ञ होते.
त्या काळी भारतातील ब्रिटिश
राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी
करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या
अध्यक्षतेखाली नेमण्यात
आलेल्या आयोगासमोर गोखले यांची
साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. या
बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे
दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात
किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही
प्रसिद्ध झाले.
न्यायमूर्ती रानडे यांच्या
आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले
यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती
रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर
गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता,
नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व
नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित
होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना)
गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना
‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत.
भारतात सर्वप्रथम कायद्याचे
राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन,
आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात
केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी
सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते.
कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून
करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या
देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक
उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार
असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू
केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची
जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ
सांभाळली. सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा
समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन
केले.  वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते
समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत.
‘राजकारणाचे
आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु
कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील
राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक
असणारी) संकल्पना त्यांनी भारतात
मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व
देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे
, असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य,
नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा
त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वत:चे
आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व
जनतेसमोर ठेवले.
संपूर्ण आयुष्य राजकारणात
राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध
सार्वजनिक जीवन जगणार्या या
महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या
४९व्या वर्षी निधन झाले.
कर्मवीर भाऊराव पाटील

बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा
पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि
वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण
संस्थेचे संस्थापक!
रयत शिक्षण संस्थेचे
संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म
कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी
झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे
त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच
भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना
प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या
मनात राग होता. अस्पृश्य समाजातील
लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी
एका विहीरीचा रहाटच मोडून टाकला होता.
त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली
जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील
शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम
हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले.
त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये
करण्यात आली. याच काळात
त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या
विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.
पुढील काळात ते सातार्यात
जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात
त्यांनी मद्वान्नामास्तर, भाऊसाहेब कुदळे,
नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर
दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’
स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व
जातीधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही
त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज
येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या
काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या
नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले.
याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या
कार्याशी जवळून संबंध आला.
दिनांक ४ ऑक्टोबर, १९१९ रोजी
कर्मवीरांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना
सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे
या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात
आले. संस्थेची काही उद्दिष्टे होती -
मागासलेल्या वर्गात शिक्षणाची
आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना
शक्यतो मोफत शिक्षण देणे.
निरनिराळ्या जातीधर्मातील
विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्या
विकासाचे वळण लावणे.
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने
पटवून देणे.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी,
शीलवान, उत्साही बनवण्याचा
प्रयत्न करणे.
बहुजन समाजाच्या शिक्षण
प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा
संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी
भाऊरावांनी आयुष्यभर अमाप कष्ट केले.
केवळ क्रमिक शिक्षण नव्हे तर, समता,
बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी
आदी मूल्यांची शिकवण त्यांनी
विद्यार्थ्यांना दिली.
सातार्यात त्यांनी एक मोठे
वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह
चालवण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचे
दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल
परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण
संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला.
या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी
लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ
लाभली. २५ फेब्रुवारी, १९२७ रोजी महात्मा
गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती
शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले
गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन
सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत
सुरू केली. १६ जून, १९३५ रोजी रयत शिक्षण
संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच
साली सातार्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर
ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
भाऊरावांनी देशातलं ‘कमवा आणि
शिका’ या तत्त्वानुसार चालणारे पहिले ‘फ्री
अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच
सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा
सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची
मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७
साली कर्मवीरांनी सातार्यात ‘छत्रपती
शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कर्हाड
येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना
केली.  शाळा व महाविद्यालयांसाठी
प्रशिक्षित शिक्षकांची वानवा पडू लागली
म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक
विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे
मौलाना आझाद यांच्या नावानं ‘आझाद
कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व
शाळांच्या, महाविद्यालयांच्या व
वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा
प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण
विकास हीच उद्दिष्टे कर्मवीरांच्या
डोळ्यासामेर होती. त्यांच्या एकूण कार्याचा
आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा
फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे
दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच
त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य
केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन
समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक
प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने
पाठपुरावा केला.
१९५९ साली त्यांना पुणे
विद्यापीठाकडून ‘डी.लिट्’ पदवी बहाल
करण्यात आली. भारत सरकारनेही
‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. श्री.
ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी.
वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे
वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे
समाधिस्थान व कर्मवीर स्मृती भवन -
यांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या स्मृती
जतन करण्यात आल्या आहेत. अशा या -
शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत
पोहोचवणार्या- आधुनिक भगीरथाची
प्राणज्योत ९ मे, १९५९ रोजी मालवली.