दहावी नापास'चा शिक्का पुसणार!
.
"नापास‘च्या ऐवजी "कौशल्य विकास प्रशिक्षणास पात्र‘ असा उल्लेख
.
- - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मे 2016 -
पुणे - दहावीच्या पुनर्परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर "नापास‘च्या ऐवजी "कौशल्य विकास प्रशिक्षणास पात्र‘ असा उल्लेख या वर्षीपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माथ्यावरील "दहावी नापास‘चा शिक्का पुसण्यासाठी सरकारने टाकलेले हे आणखी एक सकारात्मक पाऊल म्हणावे लागेल.
गेल्या वर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर त्यात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची तातडीने पुनर्परीक्षा घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सरकारने केला. साधारणतः एक ते दीड लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत नापास होत असल्याचा निष्कर्ष गेल्या काही वर्षांतील निकालावरून निघतो. या नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा यशस्वी प्रयत्न गेल्या वर्षी करण्यात आला. मात्र, त्याही परीक्षेत जवळपास 50 टक्के विद्यार्थी पुन्हा नापास झाल्याचे निदर्शनास आले; परंतु अभ्यासात गती नसणारे विद्यार्थी आयुष्यात काही करू शकत नाहीत, असा त्याचा अर्थ होत नाही. अशा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन, त्यानुसार कौशल्य विकास प्रशिक्षण दिल्यास त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे सहज शक्य आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकारतर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर "नापास‘ ऐवजी "कौशल्य विकास प्रशिक्षणास पात्र‘, असे लिहिण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांना कलमापन चाचणी अहवालाच्या आधारे कौशल्य प्रशिक्षण सुचविले जाईल. त्यानुसार पुढील वर्षभर त्यांना ते प्रशिक्षण देण्यात येईल. शालेय
शिक्षण विभागाच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे म्हणाल्या, ""राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेअंतर्गत काही करता येऊ शकेल का, या संदर्भातील विचार प्राथमिक पातळीवर सुरू आहे. त्यासाठी योजनेतील नियमावलींचा अभ्यास करण्यात येत असला तरीही, प्रशिक्षण अभ्यासक्रम हा राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फेच ठरविण्यात येईल. तसेच, या केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी शालेय शिक्षण विभागाकडे असेल; परंतु हा अभ्यासक्रम प्रमाणपत्र की पदविका स्वरूपात असावा, हे अद्याप निश्चित झालेले नाही. राज्यभरात सप्टेंबरच्या 15 तारखेपासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा मानस असून, त्यानुसार नियोजन केले जात आहे. हे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दालनं कशी खुली करावीत, याबाबत उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.‘‘
राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेंतर्गत जवळपास 60 ते 80 प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्याला अनुसरून राज्यातील या विद्यार्थ्यांसाठी कोणते अभ्यासक्रम
नव्याने सुरू करता येतील, याची चाचपणी सध्या सुरू आहे. या अभ्यासक्रमासाठी दुसऱ्यांदा अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी पात्र धरण्यात येईल. हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र असावे, असा प्रयत्न सुरू आहे. काही मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन केंद्रे असावीत, असा विचार असल्याचेही साठे यांनी सांगितले.
वैयक्तिक समुपदेशन
दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातील बरेचसे विद्यार्थी वयाने तुलनेने मोठे असतात. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक समुपदेशन करण्यात येईल. त्यानंतर त्यांची कलमापन चाचणी करून त्यानुसार त्यांना कौशल्य प्रशिक्षणाचा मार्ग सुचविला जाणार आहे. सध्या अशा विद्यार्थ्यांचे "मॅपिंग‘ सुरू आहे.