पृथ्वीची कंपनशक्ती
काही आठवडय़ांपूर्वी मणिपूर येथे मोठा भूकंप झाला. या धरणीकंपात जरी फार मोठी वित्तहानी झाली असली तरी फारशी जीवितहानी झाली नाही. भूकंप प्रभाव क्षेत्रात फार मोठी लोकसंख्या अस्तित्वात नव्हती ही एक जमेची बाजू होती. भूकंपांची संख्या सद्या वाढताना दिसत आहे व त्याच्या धक्क्याने जीवित व वित्तहानीही वाढताना दिसत आहे. धरणीकंपनाने निसर्ग आपली शक्ती किती तीव्र आहे हे सप्रमाण दाखवून देत आहे.
EARTHORBITमानवाची उत्पत्ती होऊन लाखो र्वष झाली असली तरी निसर्गाच्या ज्या काही गतिकीय प्रक्रिया सुरू आहेत त्याचा उलगडा अजूनही मानवाला झालेला नाही. या क्रिया-प्रक्रियांचा आलेख आपण काही शतकांपासून जमा करत आहोत; पण आतापर्यंत साठवलेली माहिती फार अपुरी आहे. या माहितीच्या आधारे या नैसर्गिक घडामोडींचा आलेख अचूकपणे मांडणे फार कठीण काम आहे. पण जी माहिती आपण आतापर्यंत जमा केलेली आहे. ती एका प्रकारे जिगसॉ पझलसारखी आहे. काही रकाने योग्य प्रकारे भरले गेले आहेत, तर इतर खाली रकाने अजूनही भरावयाचे आहेत.
भूकंपाचा अंदाज घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकजगत पृथ्वीच्या अंतर्गत क्षेत्रात घडणा-या घडामोडींकडे पाहात होतं. भूतुकडय़ांचे छोटे-मोठे भाग तुटल्यामुळे ज्या लहरी उत्पन्न होतात, त्यांचा त्रास सजीवांना होतो. त्यामुळे भूकंपाचे मूळ स्रेत पृथ्वीच्या पोटात शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता; पण आता ही परिस्थिती बदलू पाहात आहे. भूकंपाला सर्वार्थाने जाणायचे असेल तर आकाशातूनही त्यावर काही वेगळे विज्ञान करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. आयनांबर भूकंप विज्ञान ही नवी शाखा आता उदयास येऊ लागली आहे.
आजपर्यंत आपली समजूत पृथ्वी व वातावरण या निसर्गाच्या दोन वेगवेगळ्या विभागांची सरळमिसळ होत नाही, अशी होती, पण आपण हे विसरतो की वैश्विक आणि अवकाश एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. अवकाशात ज्या घटना हजारो- लाखो प्रकाशवर्षे दूर घडतात, त्यांचा तत्क्षणी प्रभाव आपल्या ग्रहावर पडत नाहीत. पण तो प्रभाव नंतर कधीतरी पृथ्वीला प्रभावित करतोच करतो. सूर्य, जसा पृथ्वीला फिरवतो तसाच तो सजीवांनाही जिवंत ठेवतो. चंद्राचा प्रभाव महासागराच्या पाण्यावर होतो. अगदी त्याचप्रकारे पृथ्वीसुद्धा वातावरण व अवकाशावर उलटा प्रभाव टाकत असणार असा काही वैज्ञानिकांचा कयास आहे. हा रिव्हर्स सायकॉलॉजीचा प्रकार आहे.
पृथ्वी व अवकाशाची एकमेकांशी देवाण-घेवाण कशी व कोणत्या माध्यमातून होत असेल? अर्थातच कंपनांतून. विश्वाची सारी माहिती एका ठिकाणापासून दुस-या ठिकाणी लहरी किंवा कंपनांच्या माध्यमातून होते. ही विश्वाची लिपी आहे. काहीशी ब्रेल लिपीसारखी ज्याचे ज्ञान अवगत करणे विश्वाला समजावून घेणे बंधनकारक ठरते. भूकंपनाचा सारा डोलारा त्याच्या कंपनांवर उभा राहिलेला आपल्याला आढळतो. त्याचा सारा अभ्यास व संशोधन या लहरींच्या वैशिष्टय़ांवरून केला जातो. भूतुकडय़ांच्या तुटण्यामुळे जी राक्षसी शक्ती निर्माण होते, त्याचा प्रकार कंपनांच्या माध्यमातून सर्वदूर होतो. तो त्याच रूपात भूस्तरापर्यंत पोहोचतो. पण त्याचा प्रवास भूस्तरावर येऊन थांबतो. काहींना तसे वाटत नाही. त्यांना खात्री आहे की भूकंपांचा प्रवास वातावरणातही सुरू राहतो.
भूकंपनांचे वेगवेगळे घटक आहेत, त्यातील ‘एस’ व ‘रॅले’ यांचा फार मोठा प्रतिकूल परिणाम भूस्तरावर होत असतो. इतर कंपनांच्या तुलनेत यांची तरंगलांबी अधिक असते, त्यामुळे वातावरणात यांचा शिरकाव पार आयनांबपर्यंत होत असतो किंवा होऊ शकतो. त्यामुळे भूस्तराची जी कंपनांची क्रिया होते, जमीन जेव्हा हलू लागते, अगदी त्याच प्रमाणात वातावरणसुद्धा कंपन पावू लागते या लहरी कालांतराने आयनांबपर्यंत पोहोचतात. भूस्तर ते आयनांबर या विशाल क्षेत्रात या लहरी एकमेकांशी तादात्म्य राखून हलत-डुलत असतात. भूकंपामुळे ध्वनितरंगसुद्धा निर्माण होतात. जे आयनांबपर्यंत प्रवास करतात व या प्रवासादरम्यान तिथल्या इलेक्ट्रॉन संख्येवर परिणाम करतात. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा हे तरंग वातावरणातून आयनांबरकडे जातात तेव्हा त्यांची तरंगलांबी वाढत जाते, त्यामुळे त्यांना हॅक करणे किंवा त्यांचा सुगावा लावणे सोपे होऊन जाते.
अवकाशाबद्दल आपल्याला जितकी माहिती अवगत आहे, तेवढी पृथ्वीच्या भूस्तराबद्दल ही माहिती नाही. महासागराच्या विशाल प्रदेशातही कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक क्रिया घडताहेत. याच्याबद्दलही आपण अज्ञानी आहोत, पण अवकाशात इतके उपग्रह आहेत व पृथ्वीवरून वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी जितकी यंत्रणा आपण निर्माण करून ठेवलेली आहे की त्याचा वापर भूकंपाचे संशोधन करण्यासाठी करता येऊ शकतो. आयनांबरचे विज्ञान जाणण्यासाठी जीपीएस आयनोसाँड व इन्सारसारखी उपकरणे सतत त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. या उपक्रमातून विविध प्रकारची आकडेवारी जमा झालेली आहे.
ही जी आकडेवारी आहे त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला तर अनेक नवीन माहिती आपल्या हाती लागू शकेल, या खात्रीने काही वैज्ञानिकांनी भूकंप व ही आकडेवारी याचा तुलनात्मक अभ्यास करण्यास सुरुवात केली. फार मोठय़ा प्रमाणावर जेव्हा हे संशोधन अनेक ठिकाणची आकडेवारी वापरून करण्यात आली, तेव्हा भूकंपासंबंधी अनेक आश्चर्यकारक बाबी त्यांच्या लक्षात आल्या.