लिथियम
लिथियम
• रासायनिक श्रेणी- अल्कली धातू
• अणुभार- 6.941ग्रॅ·मोल −१
• भौतिक गुणधर्म-स्थिती- घन
(Li) ( अणुक्रमांक ३) अल्कली धातूरूप रासायनिक पदार्थ. ग्रीक भाषेतील शब्द लिथॉस म्हणजे दगड या अर्थाने या धातूस लिथियम नाव देण्यात आले आहे. १८१७ साली स्वीडिश रशायनशास्त्रज्ञ आर्फेडसन यांनी लिथियमचा शोध लावला. तर १८५५ साली जर्मन रशायनशास्त्रज्ञ बुनसेन आणि इंग्लिश रशायनशास्त्रज्ञ मॅथिसन यांनी स्वतंत्रपणे, वितळलेल्या लिथियम क्लोराईडपासून विद्युतविच्छेदन करून लिथियमची शुद्ध प्रत मिळविली.
लिथियम हा धातू मृदु व रुपेरी रंगाचा असून पाण्यापेक्षा अर्ध्या वजनाचा आहे, हलकेपणात लिथियमचा कोणीच प्रतिस्पर्धी नाही. त्याच्यापेक्षा ऍल्युमिनियम ५ पट, लोखंड १५ पट आणि ओस्मियम ४० पट अधिक वजनदार आहेत. सभोवतालच्या सर्वसाधारण तपमानातदेखील लिथियम हवेतील हायड्रोजन , नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्याशी द्रुतगतीने प्रक्रिया पावतो. म्हणून लिथियम वॅसलीन किंवा तत्सम मेण्चट पदार्थात खोल साठवून ठेवतात. हायड्रोजनशी संयोग पावण्याच्या या गुणधर्मामुळे लिथियम अनेक ठिकाणी उपयोगी पडतो उदा. पाणीबुडीतील हवा शुद्ध करण्यासाठी, विमानातील श्वसन उपकरणांमध्ये, वातानुकूल उपकरणांमध्ये, इ. लिथियमचा उपयोग पदार्थास खास प्रकारची चकाकी देण्यात, रंगांमध्ये, चिनी मातीच्या वस्तुंमध्ये करतात. लिथियम फ्ल्युरॉक्साइड पासून तयार करण्यात येणारी विशेष काच अतिउच्च पारदर्शकता या गुणामुळे दुर्बिणीसाठी वापरतात.
या काचेतून जंबुपार (अल्ट्रा व्हायोलेट) प्रकाश आरपार जाऊ शकतो. लिथियमची काही संयुगे - स्टिअरेट, पामिटेट वगैरे विस्तृत तपमानातही आपले भौतिक गुणधर्म टिकवून ठेऊ शकत असल्याने त्यापासून उत्तम प्रकारचे वंगण तयार करता येते. जिथे ० अंश से. च्या खाली तपमान जाते अशा ठिकाणी मोटारींमध्ये हे वंगण वापरले जाते. बेरिलियम, तांबे , जस्त आणि चांदी यांचे लिथियम युक्त मिश्रधातू विविध क्षेत्रात मान्यता पावलेले आहेत.
सहसा आवर्त सारणीच्या डाव्या कोपऱ्यातील मूलद्रव्ये भूकवचात विपूल प्रमाणात आढळतात पण सोडियम , पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ऍल्युमिनियम या सगळ्यांपेक्षा लिथियम काहीसे दुर्मिळ आहे. या पदार्थाची किमान २० प्रकारची खनिजे निसर्गात सापडतात.